Free Bus Pass For 5th to 10th School Girls In Wardha District
जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत
जाण्याकरिता परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे.
याबाबतचे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी दिले आहेत. या
निर्णयाचा ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थिनींना लाभ होणार आहे.
शासनाने
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना स्थानिक ठिकाणी शिक्षणाची सोय
उपलब्ध नसल्यास अन्य गावांत वा शहरांत जाऊन शिक्षण घेता यावे, या उद्देशाने
अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार
मुलींना ज्या ठिकाणी त्या शिक्षण घेत आहेत, त्या ठिकाणी सेमी इंग्रजी
माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध असल्यास त्याच ठिकाणी बसने मोफत प्रवास
करण्याची परवानगी देण्यात आली होती. यामुळे ग्रामीण भागातील शेकडो मुलींना
शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाला
तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन
शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत
शासनाकडे निवेदन पाठविले व पाठपुरावा केला. शालेय शिक्षण विभागाने या
मागणीचा सहानुभूतीने विचार करून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते
दहावीपर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्याकरिता स्थानिक ठिकाणी सेमी इंग्रजी
माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यास विद्यार्थिनी अन्य गावात वा शहरात
जाऊन शिक्षण घेऊन इच्छित असल्यास, अशा विद्यार्थिनींना यापुढे बसने मोफत
प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण
विभागाने बुधवारी दिले आहेत.
शिक्षण विभागाच्या आदेशामुळे इयत्ता पाचवी
ते दहावीपर्यंतच्या मुलींना स्थानिक ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यास
अन्य गावात वा शहरात शिक्षणासाठी परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास
करता येणार आहे. यामुळे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा एकदा येण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना
दिलासा मिळाला आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या या आदेशाचे
तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर
आली आहे. यापूर्वीही महामंडळाद्वारे मुलींना पासेस उपलब्ध करून दिल्या जात
नसल्याच्या तक्रारी होत्या. याकडेही शिक्षण विभागासह वरिष्ठांनी लक्ष देणे
गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment